संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे मुक्कमी विसावला
वाल्हे / प्रतिनिधी
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज माऊलींनी रामायणकार महर्षि वाल्मिकींच्या कर्मभूमीत प्रवेश केला. माऊलींचे विश्वरूप दर्शन देणार्या समाज आरतीनंतर सोहळा वाल्ह्यात विसावला. उद्या ( मंगळवार ) हा सोहळा नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.
राम राम म्हणा वाट चाली |
यज्ञ पाऊलो पाऊली ॥
धन्य धन्य ते शरीर|
तीर्थ व्रतांचे माहेर ॥
तपोनिधी महर्षि वाल्मिकींच्या वाल्हे नगरीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दुपारी दिड वाजता आगमन झाले.
पहाटे माऊलींची महापूजा प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. त्यानंतर खंडोबारायांची जेजूरीनगरी सोडून माऊली सकाळी ७ वा. वाल्हेकडे मार्गस्थ झाल्या. माऊलींसह आलेल्या लाखो भाविकांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या खंडोबाचे दर्शन घेवून कडेपठारावरून दौंडज खिंडीत सोहळ्यात सहभागी झाले. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाले. अशा ढगाळ वातावरणातच वारकरी विठ्ठल भेटीच्या ओढीने टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाच्या जयघोषात मार्गक्रमण करीत होते. १२ कि.मी. चा प्रवास असल्याने व दुपारपर्यंत पोहोचण्याचे असल्याने वैष्णवांची पावले वाल्हे गावाच्या दिशेने झपझप पडत होती. सकाळी साडेनऊ वाजता सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी दौंडज खिंडीत पोहोचला. येथे वारकर्यांनी सकाळची न्याहरी उरकली. कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी असे म्हणत भाकरी, उसळा, विविध प्रकारच्या चटण्या व मेवा घेवून वारकर्यांनी सकाळची न्याहरी उरकली. सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा दौंडजकडे मार्गस्थ झाला. दौंडज येथे सोहळा पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. दौंडज परिसरातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. विश्रांतीनंतर हा सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाच्या जयघोषात सह्याद्रिच्या पर्वतरांगा दुमदुमून गेल्या होत्या.
सोहळा दुपारी दिड वाजता वाल्हे येथे पोहोचला. येथे सरपंच अमोल खवले , उपसरपंच अंजली कुमठेकर , ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. येथील स्वागत स्विकारून दुपारी ३ वाजता सोहळा मदनेवस्ती-शुकलवाडी येथे पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा येथे विसावला.
पालखीचनिरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश
श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उद्या ( मंगळवार ) दि. २८ रोजी सकाळी ६.३० वाजता वाल्हे येथून लोणंद मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. सकाळी हा सोहळा ११.३० पर्यंत नीरा येथे पोहोचेल. दुपारचा नैवेद्य व भोजन घेऊन विश्रांतीनंतर दुपारी अडीच वाजता हा सोहळा लोणंदकडे मार्गस्थ होईल. नीरा स्नानानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.