पालखी तळांची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
पुणे : दि.२६
करोनाच्या साथीनं दोन वर्ष न झालेली पायीवारी यावर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे. दोन वर्षानंतर नंतर प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी देहूतून पंढरपूपर्यंत पायी मार्गस्थ होणार आहे. मात्र, करोनामुळे गेली दोन वर्षे वाहनाने पालख्या पंढरपूरला न गेल्याने पालखी तळांवर अनेक कामे बाकी आहेत. याबाबत आळंदी आणि देहू संस्थानांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालखीतळ, विसावा या ठिकाणची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला बुधवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात देहू आणि आळंदी संस्थानांच्या प्रमुखांसोबत एक बैठक हेण्यात आले होती.. त्यामध्ये हे आदेश दिले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी २१ जून रोजी आळंदीतून, तर संत तुकाराम महाराज पायी पालखी २० जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. गेली दोन वर्ष पालखी प्रस्थान सोहळा झाला नसल्याने यंदाच्या वर्षी मोठय़ा प्रमाणात वारकरी सहभागी होणार आहेत. मात्र, अद्याप पालखीतळ, विसावा ठिकाणे आणि महामार्गावरील कामे पूर्ण झाली नसून अनेक समस्या कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
याबाबत बोलताना आळंदी संस्थानचे अॅड. विकास ढगे पाटील म्हणाले, ‘आळंदीत इंद्रायणी नदीतील जलपर्णी मोठय़ा प्रमाणात असून ती काढण्यात यावी, पालखीमार्गावरील अपूर्ण रस्ता, विसावा ठिकाणची दुरवस्था, अपूर्ण बांधकाम, आजूबाजूला असलेला राडारोडा, अर्धवट डांबरीकरण आदी समस्या दूर करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. पालखी सोहळय़ादरम्यान मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास वाव मिळेल एवढी मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढल्यास वारकऱ्यांची मंदिरात गर्दी होणार नाही, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.’
कामे पूर्ण करण्याची मागणी
* उरुळी देवाची, वडकी नाला, पवार वाडी, सासवड, बोरावके मळा, यमाई शिवरी, साकुर्डे, जेजुरी, पिंपरे खुर्द विहीर, लोणंद, सुरवडी, निंभोरे ओढा आदी विसाव्याच्या ठिकाणी अर्धवट कामे असून राडारोडा आहे त्या अवस्थेतच पडला आहे. अनेक ठिकाणी विसाव्याचे पटांगण सपाटीकरण राहिले आहे. अर्धवट रस्ते आणि रस्त्याच्या कडेला पडलेल्या राडारोडामुळे पाऊस पडल्यास अपघाताची शक्यता आहे. नीरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले आहेत. सासवड-जेजुरी दरम्यान असलेल्या पुलाचे काम अद्याप अर्धवट आहे.
" पालखी नियोजनासंदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी पातळीवर दोन बैठका पार पडल्या आहेत. पालखीमार्गावरील अपूर्ण रस्त्यांबाबत, विसावा असणाऱ्या ठिकाणी संबंधित प्रांत, तहसीलदार यांना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सर्व कामे येत्या १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जादा तात्पुरती शौचालये आणि अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत"
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी