निंबुत येथील अवैध दारू व्यावसायिक विरोधात
एमपीडीए अंतर्गत कारवाई केली.
बारामती. दि.२६
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबुत येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारु विक्री करणाऱ्या प्रकाश चैनसिंग नवले (वय ५२) याच्याविरोधात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. त्याला या कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.
वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी नवले याच्या विरोधातील प्रस्ताव तयार केला होता. नवले याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सुमारे २५ गुन्हे दाखल आहेत. हा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी देत नवले याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी नवले याला येरवडा कारागृहात दाखल केले आहे.
वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक लांडे यांच्यासह उपनिरीक्षक योगेश शेलार, सलिम शेख, सहाय्यक फौजदार जगताप, हवालदार महेश बनकर, रमेश नागटिळक, दीपक वारुळे, अमोल भोसले, नितीन बोराडे, महादेव साळुंके, पोपट नाळे, अमोल भुजबळ, प्राजक्ता जगताप यांच्या पथकाने एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव दाखल करण्यासाठी परिश्रम घेतले.