वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या मुर्तींना घालण्यात आले नीरा स्नान
वाल्हे(दि.30)
वाल्हे (ता.पुरंदर) येथे वाल्हे ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या मुर्तींना , सोमवती अमावस्या निमित्ताने, वीर येथील घोडेउड्डाण (ता.पुरंदर) या ठिकाणी नीरा नदी मध्ये पवित्र स्नान घालण्यात आले.
वाल्हे (ता.पुरंदर) येथे सोमवती अमावस्येनिमित्त पारंपारिक ढोलांच्या तालावर उत्सवमुर्तींना पालखीत बसविण्यात आले. गावांतर्गत पालखीची व श्रींच्या कावडीची पारंपारिक वाद्यांच्या तालावर सवाद्य मिरवणुक काढुन 'नाथ साहेबाचं चांगभलं' च्या जयघोषात पालखी निरा नदीवरील घोडेउड्डाण येथे नेण्यात आली.
त्याच बरोबर आडाचीवाडी येथील श्री काळभैरवनाथ व मदनेवस्ती येथील मसनेर देवाच्या पालख्या, सुकलवाडी येथील पालखी वीर येथील घोडेउड्डाण येथे नेहून नीरा नदीवर मूर्तींना स्नान घालण्यात आले. यावेळी मानकरी, सालकरी तसेच ग्रामस्थांनी सहभागी होऊन उत्सवमुर्तींना जलाभिषेक घालण्यात आला. पुजारी राजेंद्र गुरव, सिद्धेश आगलावे यांच्या हस्ते विधिवत पुजा करण्यात आली. स्नानानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये समाजआरती झाल्यानंतर 'नाथ साहेबाचं चांगभलं' च्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली. मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाप्रसादाचा नैवैद्य घेऊन वाजतगाजत मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. पालख्या पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाल्या.
दरम्यान, वाल्हे येथे ग्रामदैवतैच्या पालखीचे गावामध्ये आगमन झाल्यानंतर पालखी सोहळा मंदिरामध्ये नेताना भाविकांनी गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली.
तत्पूर्वी पहाटे ग्रामस्थांच्या हस्ते उत्समुर्तींना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दर्शनासाठी गाभारा खुला करण्यात आला होता.