पुरंदर तालुक्यात १२ मंदिरे व ९ मस्जिद मध्ये भोंगा लावण्याची घेण्यात आली परवानगी
नीरा दि.४
राज्यभरात धार्मिक स्थळांवर बेकायदेशीर असलेले भोंगे
उतरवण्या बाबत मनसेचे राज ठाकरे यांनी हट्ट धरलेला असताना पुरंदर तालुक्यातील १२ मंदिरे व ९ मस्जिद मध्ये भोंगे लावण्याची परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळे आता इतर धार्मिक स्थळांवर असलेले भोंगे काढले जाणार की राहणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
मनसेचे राज ठाकरे यांनी सरकारला धार्मिक स्थळांवर बेकायदेशीर असलेले भोंगे उतरवा अन्यथा आंदोलनाचा करण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर अनेक ठिकाणचे देवस्थान व मस्जिद मधील कारभाऱ्यांनी रीतसर भोंग्याची परवानगी घेतली आहे.शासनाने नियम व अटीचे पालन करून हे भोंगे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदुषण होणार नाही याबाबतची खबरदारी आता देवस्थानच्या विश्वस्त मंडळाला घ्यावी लागणार आहे.
तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन मंदिरावर स्पीकर लावण्याची परवानगी घेण्यात आली आहे.यामध्ये पिंगोरी येथील वाघेश्वरी मदिर व जेजुरी येथील खंडोबा मंदिरात स्पीकर लावण्या संदर्भात परवानगी घेण्यात आली आहे.तर ६ ठिकाणच्या मस्जिद मध्ये स्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आली आहे .यामध्ये निर येथे २,वाल्हे येथे १ बेलसर येथे १माळशिरस येथे २ जेजुरी येथे १ असे सहा ठिकाणच्या मस्जिद मध्ये परवानगी घेण्यात आली आहे.
सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये १० मंदिरांनी स्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे.यामध्ये कोडीत येथील श्रीनाथ मंदिर,विर येथील श्रीनाथ मस्कोबा ,नारायणपूर येथील दत्तमंदिर , केतकावळे येथील बालाजी मंदिर या प्रमुख मंदिरांसह ग्रामीण भागातील काही मंदिरानी स्पीकर परवानगी घेतली आहे. तर सासवड मधील २ व वीर मधील एका मस्जिद मध्ये स्पीकर लावण्याची परवानगी घेण्यात आली आहे.
ज्या धार्मिक मंदिरे किंवा मस्जिद यांनी परवानगी घेतली आहे त्यांना शासनाच्या नियम प्रमाणेच स्पीकर लावावे लागणार आहेत.सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच स्पीकर लावण्याची परवानगी असणार आहे.रात्री १० ते सकाळी ६ वाजण्या पूर्वी कोणालाही स्पीकर लावता येणार नाहीत.तर आवाज संदर्भातील नियमंचही पालन करावे आगणार आहे.
रहिवाशी ठिकाणी ४५ ते ५५ डेसिबल एवढाच आवाज ठेवावा लागणार आहे.याच उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला पाच वर्ष कैद आणि एक लक्ष रुपये दंड होऊ शकतो. त्यामूळे सर्वांनी नियमच पालन करावे असे आवाहन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.
पहाटेची नमाज स्पीकर शिवाय
सासवड येथे पहाटे पाच वाजता होणारी नमाज ही स्पीकर शिवाय करण्याचा निर्णय सासवड येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे .तर दिवसा इतर वेळी होणारी नमाजही शासनाने ठरवून दिलेल्या डेसिबलच्या नियम नुसार करण्याचा निर्णय सासवड येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे .त्यांच्या या सकारात्मक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.