वाल्हे महावितरणकडून वीज वाहिनीची देखभाल दुरुस्ती. वीज वाहिनी अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी.
वाल्हे (दि.२६)) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २७ जुन रोजी वाल्हे (ता.पुरंदर) मुक्कामी येत असून, पालखी सोहळ्यातील वैष्णवांना वीजपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये. तसेच काही ठिकाणी उघड्यावर असलेले विद्युत बॉक्स दुरूस्तीची तसेच, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. त्या अनुषंगाने वाल्हे येथे महावितरणच्या वतीने, वीज वाहिनीची देखभाल दुरूस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
वाल्हे परिसरामधील प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे, पोल सरळ करणे, घरावरील विद्युत तारा उचवणे जेणेकरून अपघात होऊ नये. डिस्ट्रीबिटिव्ह बाॅक्स बदलणे, दुरुस्ती करने अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे.
अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, उपकार्यकारी अभियंता कल्पना दराडे, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता वाल्हे अतुल जाधव, लाईनम अमोल जाधव, जनमिञ रवींद्र सुर्यवंशी, हनुमंत शिंन्दे, धनंजय कदम, रविंद्र माने, दत्तात्रय पवार, राहूल भुजबळ, विकास फेजगुडे, अमोल चव्हाण कर्मचारी वर्गाने वीज वाहिनीची देखभाल व दुरूस्ती, व लाईनला अडथळा ठरत असलेली झाडे तोडणी मोहिम राबविली.
"पावसाळा सुरू होतांना सुटणारा सोसाट्याचा वाऱ्याने तारा एकमेकांवर घासल्या जावून अथवा झाडांमध्ये घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते, त्यासाठी तारांवर येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे गरजेचे असते तसेच तारांमधील झोळ कमी करणे गरजेचे असते. त्यासाठी दरवर्षी पावसाळ्या पुर्वी ही मोहिम हाती घेतली जाते. अन्यथा पावसाळ्यात वादळ वारे सुरू होताच वीजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते; यासाठी झाडांची छाटणी तारांचे झोळ काढणे आदी कामे, विजेचा लपंडाव टाळण्यासाठी पावसाळ्या पुर्वी ही मोहिम राबविली जाते; तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी पुढील महिनाभर येत असून, पालखी मुक्कामी दिवशी विजेची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. दरम्यान वैष्णवांना वीजेच्या संदर्भात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखभाल दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे", वाल्हे शाखेचे प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता अतुल जाधव यांनी सांगितले.