Type Here to Get Search Results !

किरीट सोमय्या ठाकरे सरकारवर नवा आरोप करण्याच्या तयारीत ?

 

किरीट सोमय्या ठाकरे सरकारवर नवा आरोप करण्याच्या  तयारीत ?



मुंबई: दि.१४

      आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाल्यानंतर अज्ञातवासातून बाहेर आलेले भाजप नेते किरीट सोमय्या  आता नव्या जोमाने महाविकास आघाडी सरकारवर टीका करू लागले आहेत. आता सोमय्या  यांनी आपण ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे जाहीर केले आहे. 

           सोमय्यांकडून शनिवारी याबाबत खुलासा केला जाणार आहे. तसेच मध्यंतरी मी नॉट रिचेबल का झालो होतो, याचे उत्तरही आपण देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे आता उद्या किरीट सोमय्या महाविकास आघाडीचा कोणता नवा घोटाळा बाहेर काढतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


                यापूर्वी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी  नेत्यांची यादी जाहीर केली होती. किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्यामुळेच यशवंत जाधव, प्रताप सरनाईक आणि श्रीधर पाटणकर हे अडचणीत आले होते. केंद्रीय तपास यंत्रणांनी या तिघांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. यानंतर पुढचा नंबर हा हसन मुश्रीफ यांचा असेल, असा इशाराही सोमय्या यांनी दिला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविषयी नवा खुलासा करण्याचे संकेत सोमय्या यांनी दिले होते. त्यामुळे आता किरीट सोमय्या उद्या ठाकरे सरकारवर कोणता नवा बॉम्ब टाकतात, हे पाहावे लागेल.



मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही: सोमय्या

किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आखल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई ही महाराष्ट्रपासून कधीच वेगळी होणार नाही, केंद्रशासित होणार नाही. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. ही सगळी शिवसेनेची स्टंटबाजी असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

'विक्रांत'साठी पैसे गोळा करण्याची मोहीम प्रतिकात्मक; सोमय्यांचा पुनरूच्चार

किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा 'विक्रांत'साठी पैसे गोळा करण्याची मोहीम प्रतिकात्मक होती, ही बाब स्पष्ट केली आहे. १९९७-९८ पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली. विक्रांतचा कार्यक्रम प्रतिकात्मक होता. विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेने समर्थन दिले होते. संजय राऊत यांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणता, असा आरोप सोमय्या यांनी केला. आता किरीट सोमय्या याप्रकरणाच्या चौकशीला उपस्थित राहतात किंवा नाही, हे पाहावे लागेल. नियमाप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही न्यायालयात सगळी माहीती देत आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies