पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची निवड
पुणे दि.१५
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वाल्हे येथील प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या पुणे येथील कार्यालयात आज झालेल्या या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पारपडली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमत प्राप्त केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष बरोबरच भाजपचा एक सदस्य यामध्ये निवडून आला होता. आज दिनांक १५ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यानंतर दिगंबर दुर्गाडे यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे गेली तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करतात. ते यापूर्वी सुद्धा जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांचा मागील कार्यकाळात बँकेने चांगला नफा कमावला होता. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. दुर्गाडे यांचा अनुभव आणि कौशल्य जिल्हा बँकेसाठी उपयुक्त ठरणार आहे. दुर्गाडे यांच्या निवडीनंतर पुरंदर तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येतोय.तसेच त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.