मुंढवा खराडी बायपास येथे वाहतूक पोलिसाला ८०० फूट नेले फरफटत
पुणे दि.१७
वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर लटकवत तब्बल ८०० फुट फरफटत नेण्यात आले. ही घटना मुंढवा रोड खराडी बायपासवर शुक्रवारी घडली. कार मालकाला त्याच्यावर असलेला ४०० रुपयांचा दंड भरण्यास सांगितल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत श्रीधर कांतावर( ४३,रा.हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांनी तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी जायभाय हे सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली चौकामध्ये वाहनांच्या पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांच्या दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई करत होते. यावेळी प्रशांत कांतावार हे आय २० ही कार घेऊन आले. त्यांना थांबवण्यात आले असता, त्यांना पूर्वीची ४०० रुपये दंडाची रक्कम भरण्यास सांगण्यात आले
यावेळी त्याने जोरजोरात हॉर्न वाजवत “एक ही पोलीस ढंग का नही, पैसे कमाने के लिए खडे हो क्या” असे म्हणत गाडी दामटण्याचा प्रयत्न केला. यावेळी जायभार यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ते गाडीच्या बोनेटवर ढकलले गेले. ते गाडीच्या बोनेटवर लटकत असताना सुध् ८०० फुट अंतरावर घेऊन गेले. यात जायभाय यांच्या हाताच्या बोटास व कोपरास दुखापत झाली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.