गुंजवणीच्या योजनेच्या मार्गात महत्त्वपूर्ण बदल ? संतप्त वाल्हे ग्रामस्थांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन केला निषेध
वाल्हे (दि.१७) गुंजवणी प्रकल्पात वाल्हे व परिसरातील सर्व वाड्या - वस्त्यांचा समावेश करण्यात आला होता. परिसरातील सर्व वाड्या - वस्त्यांना पाणी मिळावं यासाठी आडाचीवाडी, बापसाईवस्ती मार्गे सर्वेक्षण केलं होतं. आडाचीवाडी, वाल्हे, कामठवाडी, पातरमळा, दातेवाडी, वडाचीवाडी, वागदरवाडी, बहीर्जीचीवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, मोरुजीचीवाडी, पवारवाडी, बाळाजीचीवाडी, दौंडज, पिंगोरी व इतर सर्व वाड्या वस्त्यांपर्यंत जलवाहिनी जाऊन या भागाला सिंचनासाठी पाणी निर्धारीत करण्यात आले होते. मात्र, गुंजवणी प्रकल्पातील जलवाहिनीच्या मार्गात करण्यात आलेल्या संशयास्पद बदलाचा वाल्हे परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. तसेच मांडकी येथे सुरु असलेले जलवाहिनीचे काम बंद पाडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. वाल्हे आणि वाड्या - वस्त्यावरील संतप्त ग्रामस्थांनी याबाबत, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदीरामध्ये रविवार (दि.१७)
गावात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्यासाठी आवाहन करण्याचा निर्णय यावेळी ग्रामस्थांनी केला. तसेच मांडकी (ता.पुरंदर) येथे जाऊन जलवाहिनीच्या पर्यवेक्षकांना तसे निवेदन देखील देण्यात आले.
यावेळी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब राऊत, फत्तेसिंग पवार, कॉंग्रेसचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे माजी उपाध्यक्ष सचिन दुर्गाडे, महेंद्र पवार, ञिंबक माळवदकर, समदास भुजबळ, शिवसेना निरा गणप्रमुख राहुल यादव आदींनी आपल्या हक्काचे गुंजवणीचे पाणी आणण्या संदर्भात शासन दरबारी संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन शेतकरी वर्गाला केले.
२०१९ ला शिवतारे यांचा पराभव झाल्यानंतर योजनेच्या मार्गात बदलाचा घाट घालण्यात आला. बारामतीमधील एका कंपनीने वाल्हे परिसरात घेतलेल्या हजारो एकर जमिनीसाठी हा लपंडाव सुरु असल्याची कुजबुज लोकांच्यात सुरु आहे.
यावेळी मांडकी (ता.पुरंदर) येथे सद्या सुरू असलेल्या गुंजवणीच्या पाईपलाईनच्या कामाच्या ठिकाणी जाऊन, सुरू असलेल्या कामाचा निषेध व्यक्त करून, जलवाहिनीचे काम बंद करावे, यासंदर्भात पर्यवेक्षकांना तसे निवेदन देखील देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय पवार, वागदरवाडीच्या सरपंच उषा पवार, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, सुर्यकांत पवार, बाळासाहेब राऊत, अतिष जगताप, सतीश पवार, मदन भुजबळ, शिवसेना युवक अध्यक्ष सागर भुजबळ, समदास राऊत, तुषार भुजबळ यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
"जलवाहिनीच्या मार्गात केलेला हा बदल धक्कादायक आहे. राजकीय विरोध बाजूला ठेवून, आपल्या परिसराचे गुंजवणीचे हक्काचे पाणी कसे मिळेल, यासाठी आपण सर्वजण मिळून संघर्ष करू. याबाबत या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंञी विजय शिवतारे, आमदार संजय जगताप यांना बरोबर घेऊन, माजी कृषीमंञी शरद पवार यांना भेटून, याबाबत मार्ग काढू". असे मत यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी व्यक्त केले.