पुणे येथे पार पडली नियोजन बैठक
पुणे दि.१८
आखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने घेण्यात येणारे 44 सावे राष्ट्रीय अधिवेशन पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन येथे डिसेंबरमध्ये होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने करावयाची पूर्वतयारी संदर्भात एक बैठक पुणे येथे नुकतीच पार पडली. होणारे अधिवेशन हे भव्यदिव्य असून अधिवेशनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडी-अडचणी प्रशासनासमोर तसेच जनतेसमोर मांडणे शक्य होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पुणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन पुणे जिल्ह्यात असल्याने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संघटनेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे येथील जांभुळकर गार्डन येथे संपन्न झाली. परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख हे या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते.यावेळी त्यांनी अधिवेशनामुळे पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडता येतात. त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रात होत असलेले बदल आणि त्याच्या भावी काळात होणार असलेल्या परिणामांचा संदर्भात चर्चा होऊन आगामी काळात या समस्यांचा किंवा मिळणाऱ्या संधीचा कसा उपयोग करून घेता येईल याबाबत धोरण ठरवता येते. पत्रकारांना यातून एक दिशा मिळत असते. त्यामुळे हे अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले. या बैठकीला परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, सतीश सांगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख जनार्दन दांडगे, हवेली प्रमुख बापूसाहेब काळभोर, हल्ला विरोधी समितीचे जिल्हाप्रमुख के.डी.गव्हाणे जिल्हा समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार,बापूसाहेब काळभोर, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, बारामतीचे सोशल मीडिया प्रमुख महेश जगताप, भोरचे अध्यक्ष वैभव भुतकर, पुणे शहराध्यक्ष बाबा तारे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनिल वडघुले, सुनील वाळुंज, दत्ता भोंगळे,अमोल बनकर,
महिला प्रतिनिधी श्रावणी कामात, सुनिता कसबे
त्याचबरोबर विविध तालुक्यातून अनेक पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात सुनील जगताप यांनी आगामी अधिवेशन कशाप्रकारे असेल. त्यामध्ये कोणकोणत्या सोयी-सुविधा असाव्या लागतील. किती पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित राहतील. आणि त्यांच्यासाठी कोणकोणत्या सुविधा निर्माण करावे लागतील आणि त्यासाठी ऊरूळीकांचन मध्ये कोणकोणत्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या बाबतची माहिती दिली. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व तालुक्यातील पत्रकार संघानी सहभाग घेऊन हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवाहन केलं. पत्रकार संघाच्या अधिवेशनासाठी निधी जमवण्याचा मोठ आव्हान संघा समोर आहे ते आपण यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी विविध तालुक्यातून आलेल्या संघाच्या अध्यक्षांनी आपण या अधिवेशनामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग देऊ असे आश्वासन दिले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी मानले. एकंदरीतच ऊरूळीकांचन मध्ये होणाऱ्या या अधिवेशनाच्या पूर्वतयारीला आता पत्रकार संघ लागला असून हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.