नीरा येथे बकरी ईद उत्साहात साजरी
नीरा
नीरा येथे बकरी ईद (ईद उल अजहा) रविवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
नीरेतील स्टेशन मस्जिद येथे मौलाना मोहंम्मद मेराज यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदानात नमाज पठण करण्यात आले. तसेच अंजुमन तारीमुल कुरआन येथील मस्जिदमध्येही नमाज पठण करण्यात आले . मौलाना मोहंम्मद मेराज यांनी बकरी ईदच्या सणाला मुस्लिम धर्मियांत विशेष महत्व आहे असे स्पष्ट केले. इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत हब्राहिम अलैही सलाम यांना अल्लाहने स्वतःच्या आवडत्या वस्तूचे त्याग करण्याचा आदेश दिला होता. अल्लाहच्या या आदेशानुसार हजरत इब्राहिम यांनी त्यांची आवडती व्यक्ती त्यांचे सुपुञ हजरत इस्माईल यांचा त्याग करण्याची वृत्ती अल्लाहच्या पसंतीस उतरली. त्यावेळी हजरत इस्माईल यांना वाचवण्यासाठी अल्लाहने त्यांच्या जागी बक-याला ठेवले. त्यावेळी बक-याची कुर्बानी देण्यात आली .अशा रितीने मौलाना मोहंम्मद मेराज यांनी पैगंबर हजरत इब्राहिम यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नीरा व परिसरातील बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
यावेळी स्टेशन मस्जिदमध्ये उपसरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच दिपक काकडे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.नीरा पोलीस दुरक्षेत्राचे फौजदार नंदकुमार सोनवलकर ,सहा.फौजदार सुदर्शन होळकर , पोलिस हवालदार संदीप मोकाशी, पो.कॉ. निलेश करे, निलेश जाधव पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
..........…............................................