बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व
बारामती :
बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या ‘कृषी 2026’ कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे. एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन यंदा तब्बल आठ दिवसांचे असणार असून, मागील वर्षी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील प्रदर्शनाला दररोज सुमारे ७० हजार शेतकऱ्यांनी भेट दिली होती.
या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन १७ जानेवारी रोजी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार असून, यावेळी देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या निमित्ताने बारामतीत पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
या प्रदर्शनाबाबत माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कृषी 2026 हे केवळ प्रदर्शन नसून, शेतीच्या भविष्याची दिशा ठरवणारे व्यासपीठ आहे. यंदा या प्रदर्शनात अनेक बदल आणि नावीन्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांना अनुभवता येणार आहेत.
या प्रदर्शनातील पाच ठळक बाबी विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्मार्ट शेती’. भारतात पहिल्यांदाच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करता येतो, याचे जिवंत प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळणार आहे. पीक नियोजन, उत्पादन वाढ, खर्च नियंत्रण आणि अचूक निर्णय यासाठी AI कसे उपयुक्त ठरू शकते, हे शेतकऱ्यांना समजणार आहे. भारतीय शेती ‘स्मार्ट युगात’ प्रवेश करत असल्याचे हे ठळक उदाहरण असल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितले.
दुसरी मोठी क्रांती म्हणजे ऊस उत्पादनात झालेली अभूतपूर्व वाढ. या प्रदर्शनात एकरी तब्बल २०० टन उत्पादन देणाऱ्या उसाचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. तसेच साधारण ५० टन उत्पादन देणारा खोडवा ऊस योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने १५० टनांपर्यंत कसा वाढवता येतो, हेही प्रत्यक्ष दाखवले जाणार आहे. यासोबतच मका, कांदा, तूर आणि केळी यांसारख्या पिकांची आधुनिक प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.
तिसरी बाब म्हणजे भीमथडी घोड्यांचे पुनरुज्जीवन. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या देशी जातीला एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. वेग, ताकद आणि चपळतेसाठी प्रसिद्ध असलेला भीमथडी घोडा ‘घोड्यांमधील फरारी’ म्हणून ओळखला जातो. ही केवळ पशुसंवर्धनाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक असल्याचे चित्र येथे पाहायला मिळणार आहे.
चौथी बाब म्हणजे भरडधान्यांचा बदललेला प्रवास. एकेकाळी गरिबांचे अन्न मानले जाणारे भरडधान्य आज आरोग्यदायी आहार म्हणून श्रीमंतांच्या ताटात पोहोचले आहे. या बदलाचा वेध घेत प्रदर्शनात विविध भरडधान्ये आणि त्यावर आधारित आधुनिक प्रक्रिया केलेले पदार्थ, जसे की भरडधान्याची स्पॅगेटी, शेतकरी व तरुण पिढीसमोर मांडण्यात येणार आहेत.
पाचवी आणि महत्त्वाची बाब म्हणजे जागतिक तंत्रज्ञानाचा संगम. इस्रायल, नेदरलँड्स, चीन, ब्राझील, जर्मनीसह १५ ते २० देशांतील अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान या प्रदर्शनात एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सोलर पॉलीहाऊस, हायड्रोपोनिक्स, रोबोटिक शेती यांसारखी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.
थोडक्यात सांगायचे तर, ‘कृषी 2026’ हे केवळ कृषी प्रदर्शन नसून, भारतीय शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उघडलेली एक नवी दारे आहेत. या प्रदर्शनाचा लाभ शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांनी घ्यावा, असे आवाहन राजेंद्र पवार यांनी केले आहे.











